पुण्यात म्हणे कोणाला तरी सुमारे 170 वर्षांपूर्वीचा पहिला वाहिला मराठी-मराठी शब्दकोश सापडला आहे. हा शब्दकोश अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. यात परभाषेतून आलेले शब्द आणि आपल्या भाषेतले शब्द असे सुमारे पंचवीस हजार शब्दांचा जणू खजिनाचा सापडला आहे. या खजिन्यातून बरीच महत्त्वाची माहिती बाहेर येत आहे. जसे की, अनुस्वार आणि अर्धचंद्र देण्याची पद्धत आता बऱ्यापैकी मागे पडत चालली आहे. आताच्या मराठीत तिचा फारसा वापर होताना दिसत नाही. याची बरीच कारणे असू शकतात. हा बदल योग्य आणि अचूक असेल तर ग्राह्य धरायला काहीच हरकत नाही. पण सध्या वापरात असलेल्या मराठीत आपण काही शब्द सर्रास चुकीच्या पद्धतीने लिहित आहोत. मग ते अर्थाने किंवा व्याकरणदृष्ट्या चुकीचे असतील.
अशा चुकीच्या मराठी भाषेविषयी 1878 रोजी पुण्यात भरलेल्या पहिल्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष म. गो. रानडे यांनी अध्यक्षीय भाषणातून बदलत्या मराठीविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर नागपूर येथे झालेल्या 80 व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांनी "बदलणाऱ्या जगात आणि बदलणाऱ्या भाषेत मराठीचे संचित टिकवायचे असेल तर मराठी साहित्यिकांनी थोडेतरी प्रगल्भ होऊन जिद्दीने शक्य तेथे मराठीत बोललेच पाहिजे', असे आवाहन केले होते. हीच चिंता आणि चर्चा यावर्षीच्या संमेलनातही पार पडली. खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे हा! पण याकडे पाहायला कोणालाही वेळ नाही. साहित्यिकांबरोबरच आपली मराठी वृत्तपत्रे, दृक-श्राव्य माध्यमे, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचीही काही जबाबदारी आहे. पण ती प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. उलट त्याबाबत संभ्रमच अधिक असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान एक घडलेला किस्सा. या किस्स्याने ही बाब किती गंभीर आहे हे कळण्यास मदत होईल. कुर्ला ते ठाणेदरम्यानचा रेल्वे प्रवासातील संवाद. दोन मराठी महाविद्यालयीन विद्यार्थी रेल्वेच्या डब्यात चर्चा करीत होते. त्यांच्या चर्चेचा विषय होता "पोलीस'. पोलीस म्हणजे पोलीस यंत्रणा नाही तर "पोलीस' हा शब्द कसा लिहिला जातो. या शब्दातील "ली' हा दीर्घ आहे की ऱ्हस्व यावर ते चर्चा करीत होते. आणि ही चर्चा का वाद जिंकण्यासाठी ते तावातावाने विविध उदाहरणेही देत होते. सरतेशेवटी दोघांनीही ब्रह्मअस्त्र काढले. मुंबईतील दोन प्रतिष्ठित वृत्तपत्रांचा (लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स) दाखला दिला आणि सांगितले की, बघ मी वाचतो त्या वृत्तपत्रात पोलीस चा "ली' हा दीर्घ आहे. ऱ्हस्व आहे. या दाखल्याने जरा हायसे वाटले की, निदान अशा पुराव्यांसाठी तरी वृत्तपत्रांचे दाखले दिले जात आहेत. म्हणजेच वृत्तपत्रांवरची जबाबदारी अजूनही पहिल्यासारखीच आहे. पण त्यात सुधारणा नाही. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये असा गोंधळ सहसा दिसून येत नाही. कुठले शब्द कसे लिहावेत याचे नियम तयार केलेले आहेत. पण त्याचा वापर कोण करतो. जो तो स्वतःची पद्धत अंगिकारतो आणि त्यामुळे विनाकारण वाद निर्माण होतात.
असाच एक शब्द "अठरा विश्व दारिद्रय' इतका अंगवळणी पडला आहे की तो चुकीचा आहे का बरोबर हे सुद्धा कळून येत नाही. पण लिहिताना मात्र परिस्थितीचे गंभीर वर्णन करण्यासाठी याचा सर्रास वापर केला जातो. वर्तमानपत्रातूनही "अठरा विश्व दारिद्रय' असेच लिहिले जाते. पण मुळात हा शब्द "अठरा विसे दारिद्रय' असा आहे. आपल्या संस्कृतीत विश्व ही एकच संकल्पना आहे. त्यामुळे अठरा विश्व आणि त्यातून येणारे दारिद्रय ही कल्पना मुळीच पटणारी नाही. 18 गुणीले 20 बरोबर 360 म्हणजेच वर्षांचे बारा महिने 360 दिवस तुमच्यावर दारिद्रयाचे सावट राहाणार. त्यामुळेच हा शब्द "अठरा विसे दारिद्रय' असा लिहिला जातो. पण कालांतराने बदल होत गेला आणि बदलत्या भाषेनुसार "अठरा विसे दारिद्रय'चे "अठरा विश्व दारिद्रय' झाले.निर्दोष मराठी लिहिण्याचा शंभर टक्के प्रयत्न करावा त्यात निदान 50 ते 75 टक्के यश मिळतेच आणि असाच प्रयत्न चालू राहिला तर 100 टक्के शुद्ध मराठी लिहिणे कदापि अवघड नाही. यासाठी फक्त नियमित वाचन, अचूक निरीक्षण, महत्त्वाच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे, असे उपदेश शाळा, महाविद्यालयांमधून मारून मुटकून सांगितले जातात. पण लिहिण्यासाठी घेतले की बरेच प्रश्न उभे राहातात. खरे पाहायला गेले तर बऱ्याचवेळा "ऱ्हस्व' आणि "दीर्घ'च कळत नाही. हे सर्व घडवून आणण्यासाठी प्रथम मानसिकता बदलण्याची गरज आहे.
स्वभाषेविषयी प्रेम, जिव्हाळा, आस्था या सगळ्या भावना एकवटल्या पाहिजेत. मग आपोआप तांत्रिक बाजूही जुळून येतील. भाषेच्या अपभ्रंषाचे आणखी एक मजेदार उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. पुराणातले दाखले देता देता "वानगी' ची वांगी झाले, हे भाषेच्या अपभ्रंषाचे मनोरंजक उदाहरण समजले जाते. "पुराणातली वानगी पुराणात'या म्हणीतील वानगी म्हणजे उदाहरण, नमुना, दाखला असा अर्थ अर्थ आहे. पण तो आजकाल तो "वांगी' असा लिहिला जातो. अनंत काणेकर यांनीही "पुराणातली वांगी' असा लघुनिबंध लिहून वांग्याच्या भाजीवर शिक्कामोर्तब करू टाकले आहे. शुद्ध भाषेविषयी अनास्था, अज्ञान आणि सखोल विचार न करण्याची सवयच अशा मनोरंजक उदाहरणांना कारणीभूत आहे. खासदारांनी लोकसभेत पंतप्रधानांविषयी "अनुद्गार' काढले. आता "अनुद्गार' या शब्दाची फोड केली असता तो (अन्+उद्गार) म्हणजेच उद्गार काढले नाही असा होतो. तरीही आपण सर्रासपणे "अनुद्गार' काढले असे लिहितो. मुळात तो शब्द "अनुदार उद्गार' असा लिहिणे अपेक्षित आहे. तसेच "विशद' ऐवजी "विषद' असेही काही वेळेस लिहिले जाते. "कलम पाचनुसार'च्या ऐवजी "कलम पाच अनुसार' असे लिहिणे उचित आहे.
अजून एक गंमतीदार उदारहरण. शाळेतील काही विद्यार्थ्यांची प्रशस्तीपत्रके पाहिली. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्ह असे गट असतात. पण "उत्तेजनार्ह' हा शब्द त्या प्रशस्तीपत्रकांवर "उत्तेजनार्थ' असा चुकीचा लिहिला जातो. मुळात ज्याची उत्तीर्ण होण्याची आर्हता आहे तो "उत्तेजनार्ह' असतो. असाच वाद "परोक्ष' आणि "अपरोक्ष' या शब्दांबाबतही आहे. परोक्ष या शब्दाची फोड (पर+अक्ष) अशी केली असता "परोक्ष' या शब्दाचा अर्थ डोळ्या आड असा होतो. पण आपण उच्चारार्थानुसार डोळ्याआड साठी "अपरोक्ष' हा शब्द वापरतो."रंगे हात पकडले', "पर्दाफाश केला', "वक्तव्याचा इन्कार केला', "माल हातोहात खपला' अशा नवीन वाक्यार्थांची सध्या वृत्तपत्रांमध्ये चलती आहे. ते चांगले वाटतात किंवा लोकांना आवडतात म्हणून वापरणे कितपत योग्य आहे. त्यासाठीचे पर्यायी शब्द मराठीत उपलब्ध आहेत. अनुक्रमे "प्रत्यक्ष लाच घेताना पकडले', "उघडकीस आणले',"प्रकाशात आणले', "लगोलग विक्री झाली' या शब्दांचा वापर करता येऊ शकतो.
जागतिकीकरणाच्या अपरिहार्य रेट्यात आर्थिक सुधारणांचे वारे वाहू लागल्यानंतरचे बदल केवळ आर्थिक नाहीत तर त्याहूनही अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक आहेत. म्हणूनच विविध मराठी वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या यांच्यामार्फत व अन्य सार्वजनिक ठिकाणी धेडगुजरी इंग्रजी शब्दांचा वापर असलेली मिश्रित मराठी भाषा लोकांच्या तोंडी बसू लागली आहे आणि तीच भाषा योग्य असा गैरसमज सर्वांनी करून घेतला आहे.
मराठी भाषा मरणार नाही. मराठी मरणार नाही. पण मराठी माणसे तर मरतातच ना ! माणसाबरोबर मराठी भाषेच्या म्हणी, वाक्यप्रचार, उपमा, दृष्टांत, उखाणे आणि बऱ्याच चांगल्या शिव्या (चांगल्या अर्थाने) या एक तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा त्या चुकीच्या अर्थाने रुढ व्हायला लागल्यात. निदान त्यासाठी तरी मराठी भाषा प्रेमिकांनी, शिक्षकांनी, शासनदरबारी अधिकाऱ्यांनी आणि दृक-श्राव्य माध्यमांनी प्रयत्न करायला हरकत नाही. सामान्य वाचक आणि निरीक्षकांनीही वर्तमानपत्रांच्या कार्यालयात वारंवार पत्रे पाठवून वार्ताहर आणि उपसंपादकांचे कान उपटून मुख्य संपादकांना जाब विचारून मराठीची हेळसांड थांबविली पाहिजे.
अरुण साधू यांनी बऱ्याच वेळा जाहीर भाषणांतून उल्लेख केल्याप्रमाणे मराठीत नवीन शब्दनिर्मिती आणि पुनरुज्जीवित शब्द यांचा अभ्यास करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. तसेच या विषयी मार्गदर्शनपर स्तंभलेखनही होत नाही. एखाद दुसरे वर्तमानपत्र सोडले तर सर्वत्र मराठी भाषेच्या शुद्धलेखनाविषयी आणि एकूणच आस्थेविषयी वानवा असल्याचे दिसून येते.
अंगवळणी पडलेले नमुन्यादाखल काही शब्द
चूक बरोबर
दैदिप्यमान, दैदीप्यमान - देदीप्यमान
हेतुपरस्पर - हेतुपुरस्सर
मतितार्थ - मथितार्थ
संयुक्तिक - सयुक्तिक
उपहारगृह - उपाहारगृह
उहापोह - ऊहापोह
दिपावली - दीपावली
क्रिडा, क्रिडांगण - क्रीडा, क्रीडांगण
नाविन्यता - नवीनता, नावीन्य
निरोद्योगी - निरुद्योगी
पारंपारिक - पारंपरिक
पश्चाताप - पश्चात्ताप
संसारिक - सांसारिक
पाश्चात्य - पाश्चात्त्य
भूतपिशाच्च - भूतपिशाच
अनुवंशिक - आनुवंशिक
हेमाडपंथी - हेमाडपंती